विजया दशमीच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पसरलेले आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक परंपरांचा मिलाफ या सणांद्वारे झालेला आपल्याला दिसतो. कुठे कृषी संस्कृतीची परंपरा जोपासत नवे पीक फेटय़ात मिरवणारा शेतकरी, कुठे घटाची स्थापना करून त्यातून सरस नीरस बियाणांची होणारी निवड, कुठे आदीशक्तीची उपासना, कुठे दुर्गेचा जयघोष तर कुठे कृष्णाचा गरबा, कुठे विविध सुक्तांचे पठण असे आध्यात्मिक वातावरण गेले नऊ दिवस देशभर होते. आज विजया दशमी अर्थात दसरा. याची महती सांगणाऱया ग्रंथांमध्ये कुणी शिष्य गुरुदक्षिणेसाठी आग्रह करतो तर गुरु ज्ञानाच्या बदल्यात द्रव्यार्जन पाप मानतो. रघुवंशातील राजा रघु त्यांच्या व्यवहारपूर्तीसाठी इंद्राकडे आपले द्रव्य मागतो आणि इंद्र त्या बदल्यात आपटय़ाच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करतो, याच दिवशी रघुकुलाचा दीपक राम दशग्रंथी रावणाचा कुकर्माबद्दल वध करून त्रिखंडात ख्याती पावतो. युगानुयुगांचा नायक बनतो. याच दिवशी अज्ञातवासातील पांडव शमीच्या झाडावर टांगलेली आपली शस्त्रे खाली उतरवतात आणि युद्धाला सज्ज होतात. अशा या अनेक अर्थांनी सजलेल्या संस्कृतीत कुणी सरस्वतीचे पूजन करतो तर कुणी शस्त्रांचे पूजन करतो आणि आपापल्या कर्तव्याप्रती प्रतिबंधीत होतो. या सर्वांचा एकोपा दिसतो तो ठिकठिकाणी होणाऱया सणातून, समारंभातून, उत्सव आणि त्यानिमित्ताने होणाऱया मिरवणुकांमधून. कुठे कुणी हत्तीवरून मिरवणूक काढतो, कुठे सामुदायिक सोने लुटले जाते, कुठे सीमोल्लंघनाच्या निमित्ताने दैवतांच्या पालख्यांचीही शर्यत लावली जाते, कुठे राम विजयाची यात्रा निघते, कुठे दैत्याचा नाश करणाऱया देवीची यात्रा निघते तर कुठे साडेतीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्ताचा योग साधत नवनव्या वस्तु खरेदीचा आनंद लुटला जातो. सर्वांच्यासाठी हा दिवस सारखाच आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. जो, तो आपापल्या पद्धतीने सण साजरा करतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येऊन काही चांगले घडविण्याचा संकल्प आणि प्रारंभ म्हणजे सण. प्रत्येक पौराणिक कथांमधून हीच संस्कृती आपणास काही सांगत आली आहे. प्रत्येक काळात काहीतरी आपत्ती, संकट, वाईट घडले आणि त्या वाईटावर मात करणाऱया मानवांनी काही विशेष करून दाखविले, जे पुढच्या काळाला सदैव मार्गदर्शक बनले. आपल्या धर्मग्रंथांमधून काय शिकायचे, असा प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो, तेव्हा या कथानकांमागचा अन्वयार्थ जाणून घ्यावा. चमत्कारांच्या आणि कुणाला तरी देव किंवा असूर ठरविण्याच्या पलीकडे जाऊन या कथानकांचा विचार मानवी हिताच्या दृष्टीने केला आणि द्वेषाच्या भावनेला बाजूला सारून चांगले आणि वाईट यांच्यातील संघर्षापुरताच त्याचा विचार केला तर या कथा आजही जगण्यास मार्गदर्शक ठरतात. आपण काय घ्यायचे हे शेवटी आपल्यावर असते. अलीकडच्या काळात या धर्मग्रंथातील देव, दानव वादावर जितकी चर्चा घडते तितकी ती मानव विकासासाठी या घटनांचा विचार कसा करता येईल याबाबत होत नाही आणि दुर्दैवाने दोन्ही बाजूने आपले म्हणणे तेच योग्य असा आग्रह असतो. दुसऱयाचे मत खोडून काढणे हेच जणू आपले काम आहे आणि आपण आपल्या संस्कृतीला याद्वारेच जपतो असे भासवणारेच सर्वत्र दिसतात. परिणामी समाजात तट पडलेले सर्वत्र दिसते. मनाला त्याची टोचणीही लागते. पण, तरीही जो, तो यामध्ये स्वतःही ओढला जातो. या कथानकांच्या पलीकडे त्याचा काही अन्वयार्थ आहे आणि तो दोन संस्कृतीच्या विरोधात नसून दोन प्रवृत्तींचा निर्देशक आहे हे मान्यच होत नाही. दानवातही सद्गुणांचे पुतळे आहेत आणि देवातही दुर्गुणाचा अंश हे विसरले जाते. मग दोन संस्कृतींच्या मिलाफाऐवजी संघर्षच दिसून येतो. अलीकडच्या काळात तर हे संघर्ष अधिक तीव्र होत आहेत. दुर्दैवाने जग एक खेडे बनल्याचे एकीकडे आपण मानतो आणि त्याचवेळी आपल्याच शेजारी राहणाऱया भिन्न पंथ, सांप्रदायाच्या, वर्णाच्या माणसाला आपण आपले मानत नाही. सगळे विश्व हेच आमचे घर आहे असे मानतो पण शेजाऱयाशी आपले पटत नाही. यात बऱयाचदा त्याची आणि आपली संस्कृती वेगळी हे कारण ठरते. या कारणातून उभारलेला संघर्ष एक वेगळेच दुःख देऊन जातो. वास्तविक सणांच्या उत्साही वातावरणात यावर चर्चा करणे अयोग्य. मात्र हीच वेळ आहे बदल स्वीकारण्याची. जग बदलत चालले आहे. पिढय़ा बदलत आहेत आणि त्यांच्यासमोर नव्या जगाची नवी आव्हाने आहेत. त्यांना पंचविसावा तास स्वतःसाठी हवा आहे. त्यांना आनंदाचा एक क्षणही सणासारखा साजरा करायचा असतो. या नव्या पिढीला आनंदी जगायचे आहे. जुन्या विचारांच्या संघर्षात त्यांचा रस कमी झाला आहे. त्यांच्यादृष्टीने जग जोडून घेण्यास सण उपयोगी येणे त्यांच्या हिताचे आहे. भिन्न धर्म, संस्कृतीतील चालीरिती, सण, उत्सवातही ते समरसून जात आहेत आणि त्याचवेळी आपल्या संस्कृतीचे वेगळेपणही त्यांना जपायचे आहे. हा काही आपल्याच देशाचा अपवाद नाही. सर्वच संस्कृतीत असा विचार सुरू आहे. अशावेळी विचारांचे सीमोल्लंघन गरजेचे आहे. आपली आणि इतरांचीही संस्कृती समजून सुधारून घेणे गरजेचे आहे. नित्य नूतन विचाराच्या आपल्या संस्कृतीत आघाडय़ाचे महत्त्वच मुळात भिन्न संस्कृतीचा मिलाफ आहे. नाग, बैल अन् सरस्वतीचीही पूजा जो समाज करतो तो दोन संस्कृतीच्या मिलाफाचाच जयघोष करतो. आपल्या धर्म आणि संस्कृतीने फार पूर्वी हे दोन टोकांचे विचार स्वीकारले आहेत. आता जगाच्या दोन टोकांना जोडायची वेळ आलेली आहे. संस्कृती विकसित होते तिलाही सीमोल्लंघन करायचे असते, ती घडत जाते, बदलत जाते आणि आपल्या स्वत्वामध्ये नवीन काहीतरी स्वीकारून विकसित होते. प्रागतिक आणि अधिक विकसित संस्कृती हे यापुढच्या प्रत्येक विजयादशमीचे सूत्र ठरावे याच शुभेच्छा.