सतार हे एक भारतीय तंतुवादय असून सितार, सेतार, सेतारा अशा विविध नावांनी हे वादय ओळखले जाते. या वादयाच्या उत्पत्तीसंबंधात अनेक मते आहेत. मध्यपूर्वेतील तंबूर व पंडोर या वादयांशी सतारीचे नाते जोडता येईल. चार हजार वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधील पुतळ्यांवर व मुद्रांवर अशा वादयांच्या प्रतिमा आढळतात. ग्रीकांनी या वादयाला ‘ पंडूरा ’ हे नाव दिले होते व ते सुमेरी ‘ पंत-उर ’ नावाचे रूप होते. अरबस्थानातील तंबूर ह्या वादयाला सतारीप्रमाणेच अर्धगोलाकार बूड, मान, लांब दांडा व त्यावर पडदे असतात. फार्सी भाषेत याला तार, दु-तार, सेह-तार (त्रितंत्री) इ. नावे आहेत.
भारतातही एक तीन तारांचे वादय होते.संगीतरत्नाकरा त यास त्रितंत्री म्हणले आहे. या प्राचीन त्रितंत्री वीणेची सतार ही सुधारित आवृत्ती असावी, असे मानले जाते. मुळात तीन तारा असलेल्या या वादयात सुधारणा होऊन, सध्याची प्रचलित सात तारांची सतार विकसित झाली. पर्शियन सेहतार वरून (तीन तारांचे वादय) सेतार, सितार ही पर्यायी नामरूपे आली असावीत, असेही मानले जाते. सेह या फार्सी शब्दाचा अर्थ तीन असा आहे. त्यावरून या वादयाला सितार हे नाव मिळले होते.संगीतसमयसार या गंथात सितार हेच नाव आहे. सेहतार (सेतार) या काश्मीरी वादयाशी प्रचलित सतारीचे बरेचसे साम्य आढळून येते. मूळच्या तीन ऐवजी सध्याच्या प्रचलित सात तारांमुळे ‘ सप्ततार ’ वरून सतार, अशीही उपपत्ती मांडली जाते. ‘ ऊद ’ या पर्शियन वादयाशी सतारीचे खूपच साम्य आढळते. या पर्शियन वादयाची एतद्देशीय वीणाप्रकाराशी सांगड घालूनअमीर खुसरौ या संगीतकाराने तेराव्या शतकात सतार निर्माण केली, अशी पारंपरिक समजूत रूढ असली, तरी त्याविषयी मतभेद आहेत. अमीर खुसरौशी नामसाधर्म्य असलेल्या खुसरौ खान (सुप्रसिद्ध सदारंग या गायकाचा बंधू) या अठराव्या शतकातील संगीततज्ज्ञाने सतारीचा शोध लावला, असेही एक मत आहे.सतारीचा आकार साधारणपणे ⇨तंबोऱ्या सारखा असतोसंगीतसार या गंथात निबद्ध (स्वरांचे पडदे असलेला) तंबूर (तंबोरा) म्हणजेच सितार होय, असे म्हणले आहे. तंबोऱ्याप्रमाणेच सतारीला एक भोपळा, गळा व एक लाकडी पोकळ दांडी असते. दांडी वरच्या बाजूला चपटी व खालून गोलाकार असते. तिची लांबी सु. ३ फुट (सु. ९० सेंमी.) व रूंदी सु. ३ इंच (सु. ७.५ सेंमी.) असते. या दांडीवर वकाकार, पितळी वा पंचरसी धातूचे १९ ते २१ पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंती पट्टी व घोडी, तसेच स्वरमेलनासाठी खुंटया असतात. वादनासाठी असलेले पितळी पडदे हे ⇨वीणे प्रमाणे अचल (स्थिर) नसून, ते चल म्हणजेच वेगवेगळ्या थाटांनुसार खालीवर सरकवून बदलण्याजोगे – सरकते असतात. सतारीच्या सात तारा पुढीलप्रमाणे असतात: डावीकडून पहिली, पोलादाची असते व ती मध्यमात लावतात. डाव्या तर्जनीने व मध्यमेने या तारेवर योग्य पडदयावर दाब देऊन किंवा तार खेचून बहुतेक सर्व वादन करतात. दुसरी व तिसरी (किंवा जोडी) पितळेची असून त्या षड्ज, मध्यमात मिळवतात. चौथी व पाचवी ह्यादेखील पितळेच्याच असून त्या पंचमात लावतात. सहावी व सातवी या शेवटच्या दोन तारांना चिकारीच्या तारा म्हणतात आणि त्या तारा षड्जात असतात[१]